गणपतीपुळेत ‘विकेंड’ला प्रचंड गर्दी

रत्नागिरी : तालुक्यातील (Ratnagiri) जागतिक दर्जाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे विकेंडला पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. शनिवार, रविवार जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, पुण्याच्‍या पर्यटकांनी गणपतीपुळेला (Ganpatipule) प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचीही जोड मिळालेली आहे. दोन दिवसांत सुमारे २५ हजार भक्तांनी गणपतीपुळे मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

दिवाळीतील सुटीत मोजकेच दिवस पर्यटकांचा (Tourist) गणपतीपुळे येथे राबता होता, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे विशेष फायदा व्यावसायिकांना झालेला नाही. मात्र, शासकीय सुटीच्या दोन दिवसांमधून ती कसर भरून निघत असल्याचे समाधान व्यावसायिकांतून व्यक्त केले जात आहे. गणपतीपुळे किनाऱ्याच्या निसर्गसौंदर्याची भुरळ परजिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच पडते. त्यामुळे सुटी पडली की, अनेकजणं श्रींच्या दर्शनाबरोबरच किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी धाव घेतात.

येथील अथांग पसरलेला विलोभनीय किनारा पर्यटकांसाठी विशेष आहे. शुक्रवारी सायंकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांचा राबता वाढला आहे. सायंकाळपासूनच मुंबई, पुण्यामधून निघालेले पर्यटक शनिवारीच गणपतीपुळे, दापोलीत दाखल झाले आहेत. मागील आठवड्यात थंडीही वाढली असल्यामुळे त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपसुकच किनारी भागाकडे वळली आहेत.

त्यामुळे आंजर्लेत डॉल्फीन पाहण्यासाठी, हर्णैत मासळी खरेदीसाठी, गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी तर गणपतीपुळे येथे देवदर्शनासह किनाऱ्यावर मौजमजेसाठी पर्यटक आले आहेत. गणपतीपुळेमध्ये दोन दिवसांत पंचवीस हजार पर्यटकांनी मंदिरात प्रवेश केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियमित पर्यटकांबरोबरच परजिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या सहलींचेही प्रमाण वाढले आहे. सहलीतून येणारे विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर असलेले वॉटर स्पोर्ट, उंट, घोडे सफर एटीव्ही बाईकचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आहे.

निवडणुका संपल्याचा फायदा

विधानसभा निवडणुकीमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी तिकडेच अडकून पडले होता. एक महिन्याहून अधिक काळ त्यांना फिरण्यासाठी बाहेरच जाता आले नाही. निवडणूक संपल्यानंतर येणाऱ्या शासकीय सुट्यांमध्ये सर्वजण फिरण्यासाठी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे गणपतीपुळेतील गर्दी वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांनी शनिवारी मुक्काम केल्यामुळे लॉजिंग आणि न्याहारी निवास व्यावसायिकांचा फायदा झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 02-12-2024