सावर्डे : दुर्बिणीद्वारे मेंदूतील गाठ काढण्याची कोकणातील पहिली मायक्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वालावलकर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली आहे. ही जटील मेंदूची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत बीकेएल वालावलकर हॉस्पिटलमध्ये विनामूल्य करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोकणातील रुग्णांना आता मेंदूतील ट्यूमरच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यात जाण्याची गरज नसल्याचे सिद्ध झाले आहे.
देवरूख परिसरातील बारा वर्षांची बालिका तिला पंधरा दिवस उलटी होण्याचा त्रास जाणवत होता. डोकेही खूप दुखत होते. यावर विविध डॉक्टरांचे उपचारही घेण्यात आले; मात्र गुण आला नाही उलट तिचे वजन दहा किलोने घटले. प्रकृती बारीक अशक्त झाली. अगदी हताश होऊन तिच्या पालकांनी शेवटचा उपाय म्हणून तिला डेरवण (ता.. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केले. न्यूरोसर्जन मुदुल भटजीवाले यांनी तिच्या मेंदूचा मशीनद्वारे सूक्ष्म तपासणी केली. तपासणीत मेंदूच्या पाण्याच्या नलिकांमध्ये एक गाठ आढळून आली. त्या गाठीला एपेण्डिमोमा असे म्हणतात.
त्या गाढीमुळे तिच्या मेंदूला सूज येऊन ती गाठ मेंदूवर दाब देत असल्याने उलट्या होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. बालिका अगदी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत जाणार त्या अगोदरच तिच्यावर अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या शस्त्रक्रियेनंतर तिच्या उलट्याही थांबल्या असून, आता ती चालू-फिरू लागली आहे. आता तर ती पुन्हा शाळेत जाण्याचा विचारही करत आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. भटजीवाले, डॉ. श्रेया टिबडेवाल, डॉ. सुधांशू राणे, डॉ. लीना ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 03/Dec/2024














