चिपळूण : सावर्डे परिसर बनतोय खैर तस्करीचा अड्डा

चिपळूण : राज्याच्या वेगवेगळ्या भागातून चिपळूणमध्ये खैराची तस्करी केली जात आहे. कात बनवण्यासाठी खैराचा वापर होतो. सावर्डे परिसरात कात बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे सावर्डेचा परिसर खैर तस्करीचा अड्डा बनला आहे.

नाशिक वनविभागाकडून खैर तस्करीप्रकरणी सावर्डे परिसरात करण्यात आलेली कारवाई आणि संशयितांच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. गुटखा बनवण्यासाठी लागत असलेला कात हेही खैरच्या तस्करीमागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. नैसर्गिकरित्या पावसामध्ये त्याची जी वाढ होते त्यामुळे गुटखा व कात यास अधिक चव येते. खैराच्या लाकडालाही प्रचंड मागणी आहे. खैरचा एक घनमीटर म्हणजे ३५ क्युबिक फुटाचा शासकीय दर ९० हजार रुपये आहे. खैरामध्ये दोन प्रकार असतात. एक लाल व पांढरा. लाल रंगाच्या बुंध्यास मागणी आहे.

कोकणात खासगी वनक्षेत्रे आहेत. वनक्षेत्र मालकास वनसंपत्तीची तोड करून साठवणूक करण्यासाठी परवाना दिला जातो. परवान्यामध्ये किती साठ्याला परवानगी आहे, हेही नमूद असते; मात्र यामधून पळवाट शोधली जाते. परवानगी दिलेला साठा कायम ठेवला जातो. तस्करी करून आणलेला खैरसाठा हा अवैधरित्या बाहेर विकला जातो. कारवाई केली तर परवाना पुरावा म्हणून दाखवला जातो. कारवाई करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागतो.

नाशिक जिल्ह्यातून अवैधरीत्या किती खैर लाकूड चिपळूणमध्ये आणण्यात आला. तो कोणाला विकला गेला, याचा तपास आम्ही करत आहोत. काही संशयित व्यावसायिकांना नोटीसही पाठवली आहे. तपासातून ज्या गोष्टी उघड होतील त्याची माहिती गुजरात ईडीला दिली जाईल. – विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, नाशिक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 03/Dec/2024