“मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण मोदी देव नाहीत” : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

दिल्ली सरकारचे काम बंद पाडल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण मोदी देव नाहीत. या जगात देव आहे, काही तरी शक्ती आहे, ती माझ्यासोबत आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका नेत्यासोबत चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना विचारले असता, ते मला म्हणाले की, मी तुमचे सरकार पाडले आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. २७ वर्षांपासून दिल्लीतील जनता त्यांना मतदान करत नाही. औषधे आणि केजरीवाल यांची बदनामी करून तुम्हाला मते मिळवायची आहेत, हे चुकीचे आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

लोक म्हणतात तुरुंगात गेल्याने नुकसान झाले. नुकसान झाले हे मला मान्य आहे. पण केजरीवालांचे नुकसान झाले नाही, मनीष सिसोदिया यांचे नुकसान झाले नाही, पण दिल्लीतील दोन कोटी जनतेचे नुकसान झाले. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये औषधे बंद करण्यात आली आहेत. थोडं देवाला घाबरा. कोणाचाही अहंकार टिकू शकत नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

याचबरोबर, भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची मानसिकता नकारात्मक आहे, त्यांना तुरुंगात पाठवा. तसेच, बसमधून मार्शल काढले, मार्शलचे काम कोण करतंय, गोरगरिबांची मुले नोकरी करतात. वृद्धांची पेन्शन बंद केली, तीर्थयात्रा बंद केली, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

…तर मला मतदान करा – केजरीवाल
मी प्रामाणिक आहे, असे जनतेला वाटत असेल तर मला मतदान करा, अन्यथा मतदान करू नका, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपाने जे काही काम थांबवले होते, ते मी पुन्हा सुरू करेन. तुरुंगात गेल्याने नुकसान झाले, पण ते केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचे नाही तर दिल्लीच्या जनतेचे नुकसान झाले, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 26-09-2024