Ratnagiri : जिल्ह्यात ई-पीक पाहणीला अत्यल्प प्रतिसाद

रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे पाच लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ९३२७ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीला अल्प प्रतिसाद दिला असला तरी नैसर्गिक आपत्तीत भरपाई आणि पिकाला विमा संरक्षण देण्यासाठी ई- पीक पाहणी महत्वाची आहे. त्यामुळे शेतक-यांनी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ पाहणीसाठी नोंदणी करत सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळविले आहे. यामध्ये तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास येत आहे. पीकविमा योजनेत सातबाऱ्यावर अंतिम पीक नोंदणी आवश्यक असल्याने ‘ई-पीक’ पाहणी गरजेची आहे. मात्र, अॅपच्या माध्यमातून पीक पाहणी करताना नेटवर्क समस्या, अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे शेतकरी ई पीक पाहणी पासून दूर आहेत. त्यासाठी अॅपवरील मदत (हेल्प) बटनवर क्लिक करून त्यामध्ये असलेले व्हिडीओ पाहून समस्या मार्गी लागू शकते. ज्या शेतकऱ्यांना त्यामध्ये अडचणी असतील तर त्यांनी तातडीने तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन, कृषी विभागाने केले आहे.

प्रत्येक खातेदाराने पीक विमा नोंदविणे आवश्यक आहे. पीक विमा, पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी ती गरजेची आहे, त्यामुळ शेतकऱ्यांनी तातडीने पीक पाहणी करावी, अजय शेंडे जिल्हा कृषी अधीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:12 PM 26/Sep/2024