गुहागर : भारतीय तटरक्षक दलाची नॅशनल मरिन सर्च अँड रेस्क्यू बोर्डची जनरल सभा दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी क्राऊन प्लाझा कोचीन (केरळ) येथे झाली. या सभेला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोकणातील मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी कोकणातील कोळ्यांचा पारंपरिक पोषाख परिधान करुन तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसह कोचीनवासियांची मने जिंकली. यावेळी खोल समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके पाहण्याची संधीही कोकणातील मच्छिमारांना मिळाली.
या सभेत मच्छीमार संघटनांच्या समस्या, अडचणी, बचाव कार्यासाठी नवीन संशोधन यावर देशभरातून किनारी भागातून आलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तटरक्षक दलाच्या मोठ्या दोन जहाजांमधून सहभागी मच्छिमार प्रतिनिधींना खोल समुद्रात नेण्यात आले. यावेळी बोटीला आग लागणे, बोट बुडणे व विमान इंजिन बिघडल्यामुळे पाण्यात उतरविल्यास तटरक्षक दलाकडून कसे बचाव कार्य केले जाते याची थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये तटरक्षक दलाच्या दहा ते बारा लहान-मोठी जहाजे, कस्टम, नेव्ही व सागरी पोलिस दलाच्या बोटी, छोट्या लाईफ गार्ड व रिमोटने ऑपरेट करीत असलेले लाईफ गार्डच्या बोटी आणि ४-५ हेलिकॉप्टरच्या कसरती मच्छीमारांनी पाहिल्या.
यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी कोकणातील कोळ्यांचा पारंपरिक पोशाख कोळी रुमाल, टी शर्ट, जॅकेट व कोळी टोपी घालून नृत्य सादर केले. या कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मच्छिमार प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल व सेक्रेटरी जॅक्सन पद्मोल यांना भाग घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी तटरक्षक दलाचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 05/Dec/2024












