‘उमेद’ कर्मचाऱ्यांचे आजपासून आमरण उपोषण

रत्नागिरी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते. अभियानाच्या माध्यमातून तब्बल ३००० अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी दि. २७ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षांपासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती; परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दि.१० ते १२ जुलै २०२४ दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तब्बल अडीच महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत.

अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेच्या अध्यक्षा रूपाली नाकाडे यांनी आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 27/Sep/2024