रत्नागिरी : थिबा पॅलेस येथील मल्टीमीडिया शो चे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : रत्नागिरीचा पर्यटन विकास होण्यासाठी रत्नागिरीचे आमदार व माजी पालकमंत्री यांनी अनेक उपक्रम हाती घेतले असून, त्यातील काही उपक्रम पूर्णत्वाला जात आहेत. शहरातील थिबा राजवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीमीडिया शोचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महिनाभरात याचा शुभारंभ व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

रत्नागिरीचे पालकमंत्री असताना उदय सामंत यांनी रत्नागिरीत पर्यटक मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये गणपतीपुळे विकास आराखडा असो की मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय असो, रत्नागिरी शहरात थिबापॅलेस बागेत भव्य छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, माळनाका येथील श्री विठ्ठल मूर्ती, रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी आदी उपक्रम हाती घेतले. यातील काही उपक्रम पूर्ण झाले तर काही अंतिम टप्प्यात आहेत.

यातील मल्टीमीडिया शोचे आयोजन थेट इंग्रजकालीन थिवाराजवाड्यावर करण्याचा मानस त्यांनी केला. थिबा राजवाडा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात, सायंकाळनंतर याठिकाणी मल्टीमिडीया शोच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा काळ, कोकणातील महान व्यक्ती महत्त्व, कोकणचा इतिहास या शोच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.

मल्टीमिडीया शोचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. याठिकाणी साडेतिनशे व्यक्तींची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. परिसरात बाजूने हिरवळ पसरवण्याचे काम सुरु आहे. मल्टीमीडिया शोसाठी २० कोटी व अन्य कामांसाठी २ कोटी असे २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रत्नागिरी शहरामधील थिबा पॅलेस येथील हे काम अंतिम टप्प्याकडे सरकत असून, पुढील महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी आशा नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 09/Dec/2024