रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र लाभार्थी भगिनी वंचित राहणार नाही. या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशातून उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, औषधोपचारासाठी, स्वतःच्या खर्चासाठी मदत होणार आहे. त्यासाठी शासनाचा हातभार लागला आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
पालकमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मालगुंड, गणपतीपुळे, बसणी, काळबादेवी, आडे शिरगाव, शिरगाव उद्यमनगर, मिरजोळे, मजगाव, केळये, दांडेआडम आदी गावातील कुटुंबांची भेट घेतली. यानंतर झालेल्या गावभेट या मुख्य कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी राहुल पंडित, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, योजनेची माहिती, लाभ तुमच्यापर्यंत पोहचविण्यात प्रामाणिक प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. या योजनेतील पैसे किती जणींना मिळाले आहे, किती जणींना मिळाले नाहीत. त्यासंदर्भात समस्या जाणून घेण्यासाठी मी कालपासून कुटुंबांना भेटी देत आहे. गावांना भेटी देत आहे आणि प्रत्यक्ष चर्चा करत आहे.
या योजनेच्या लाभापासून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी घेतली आहे. सर्व जाती-धर्मांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्हा भगिनींना देण्यात आम्ही भाऊ यशस्वी झालो, याचे आज समाधान वाटते. ही योजना बंद करण्यासाठी काही जण न्यायालयात गेले; परंतु न्यायालयानेही या योजनेबाबत निर्वाळा दिला. भविष्यात ही योजना बंद होणार नाही. उलट या योजनेतील रकमेत वाढच होईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 27/Sep/2024