खेडमधील वाहनचालकांना मोठा दिलासा! सीएनजी पंपावर आता स्थानिकांसाठी ‘स्वतंत्र रांग’; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दणका

खेड : देशभरात सध्या जाणवत असलेल्या सीएनजी (CNG) तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील स्थानिक वाहनचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खेडमधील सीएनजी पंपांवर होणारी कोंडी आणि स्थानिकांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तातडीने आदेश दिले आहेत. या आदेशानंतर खेडमधील सीएनजी पंपावर स्थानिक वाहन चालकांसाठी आता ‘स्वतंत्र रांग’ (Separate Queue) सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक रिक्षाचालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना मोठा फायदा होणार आहे.

‘पोट भरायचं कसं?’ पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक चालकांसमोर उभा ठाकला होता प्रश्न

सध्या कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने मुंबई, पुणे आणि इतर भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत आहेत. याचा थेट परिणाम कोकणातील सीएनजी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर जाणवत होता. खेडमधील सीएनजी पंपांवर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. बाहेरून येणाऱ्या या वाहनांमुळे स्थानिक वाहनचालकांना सीएनजी मिळवण्यासाठी अनेक तास ताटकळत राहावे लागत होते.

रोजंदारीवर चालणाऱ्या रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांचा संपूर्ण वेळ रांगेतच जात असल्याने, “पोट पुढं भरायचं कसं? रोजची रोजीरोटी कशी चालवायची?” असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

व्यथा मांडली अन् अवघ्या काही तासांत प्रश्न सुटला!

स्थानिक वाहतूकदार, रिक्षाचालक आणि मालकांनी एकत्र येत आपली ही गंभीर व्यथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नामदार योगेश कदम यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आणि पंप प्रशासनाला कडक सूचना दिल्या. मंत्र्यांच्या या आदेशानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत अवघ्या काही तासांतच स्थानिक सीएनजी धारक वाहनांसाठी स्वतंत्र लाईन कार्यान्वित केली.

चालक-मालक संघटनांकडून निर्णयाचे जोरदार स्वागत

प्रशासनाने केलेल्या या जलद कारवाईमुळे स्थानिक चालकांचा कित्येक तासांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. वेळेत गॅस उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. ऐन अडचणीच्या काळात तातडीने धावून येत प्रश्न सोडवल्याबद्दल खेड तालुक्यातील विविध चालक-मालक संघटनांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे जाहीर आभार मानले आहेत. सध्या खेड तालुक्यात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून स्थानिक वाहन चालकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.