Khed: खेडमध्ये सीएनजी पंपावर स्थानिकांसाठी स्वतंत्र रांग

खेड : तालुक्यातील सीएनजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानंतर खेडमधील सीएनजी पंपावर स्थानिक वाहन चालकांसाठी स्वतंत्र रांग सुरू करण्यात आली असून त्यामुळे रिक्षाचालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना मोठा फायदा होणार आहे.

देशभरात सुरू असलेल्या सीएनजी तुटवड्याचा परिणाम कोकणातील वाहतूक व्यवस्थेवरही जाणवत आहे. विशेषतः पर्यटन हंगामामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असल्याने खेडमधील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या.

बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे स्थानिक चालकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, रोजंदारीवर चालणाऱ्या चालकांसमोर “पोट पुढं भरायचं कसं?” असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहतूकदार व चालकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर तातडीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आणि अवघ्या काही तासांत स्थानिक सीएनजी धारक वाहनांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आली.

या निर्णयामुळे स्थानिक चालकांचा वेळ वाचणार असून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून प्रश्न सोडवल्याबद्दल विविध चालक-मालक संघटनांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानण्यात आले आहेत. खेड तालुक्यात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून स्थानिक वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 25-05-2026