चिपळूण : अनंत चतुर्दशी झाल्यानंतर चिपळुणातील पूर, पाणी आणि महामार्ग आदी समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन हे विषय मार्गी लावणार आहे. यासाठी संबंधितांना पत्र दिले आहे. तसेच राजापुरातील वारसू येथे रिफायनरी होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली.
खा, राणे रविवारी (दि. १५) चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. त्यापूर्वी त्यांनी ‘भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारली.
यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान खा. राणे यांनी राजकीय वक्तव्य केले. ते म्हणाले, नितेश राणे यांनी अल्पसंख्याक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा अर्थ काढला तर त्यांना तसे म्हणायचे नव्हते. देशात, राज्यात अनेक राष्ट्रप्रेमी अल्पसंख्याक आहेत. मात्र, काहींकडून हिंदूंच्या महिला, तरुणींवर अनेकवेळा अत्याचार होत आहेत. अशावेळी आपला समाज एकत्र का येत नाही? जागरूक का होत नाही? नितेश राणे बोलल्यावर त्यांच्याविरोधात सगळे एक होतात. नितेश याने वक्तव्य करताना मशिदीचा केलेला उल्लेख चुकीचा होता. याबाबत त्याने माफी मागून खुलासादेखील केला आहे. हिंदू महिला, तरुणींवर अत्याचार होत राहिले तर अनेक नितेश राणे, नारायण राणे निर्माण होतील. ज्यांनी समाजासाठी काहीही केले नाही, जनहिताचा मुद्दा मांडला नाही, ज्यांना राजकारणातले काही कळत नाही अशा संजय राऊत व आदित्य ठाकरे यांची देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याची योग्यता नाही. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत दोनवेळा मंत्रालयात गेलेल्यांनी मात्र अडीच वर्षांचे मानधन खाल्ले. आता सत्ता नसताना टीका करीत आहेत. विकास होण्यामागे महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे.