Sanjay Raut on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पराभव; संजय राऊत म्हणाले…

मुंबई: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची जोरदार पाठराखण केली आहे. “ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही, तर केंद्र सरकारने सर्व यंत्रणांचा पराकोटीचा गैरवापर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे,” असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.

“सैन्य, आर्थिक दहशतवाद आणि अफवांच्या जोरावर निवडणूक”

संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वातावरणाची तुलना थेट आंतरराष्ट्रीय युद्धाशी केली. ते म्हणाले, “बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी इराण-इस्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली होती. तिथे केंद्रीय सैन्य यंत्रणा, आर्थिक दहशतवाद आणि अफवांचे पेव फुटले होते. इतकेच नाही तर मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळून ममता बॅनर्जींना पराभूत करण्याचे कारस्थान रचले गेले.”

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास जो नकार दिला आहे, त्याचे राऊत यांनी समर्थन केले. “त्यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा निवडणूक आयोग आणि सरकारच्या हुकूमशाही कृत्यांविरुद्ध पुकारलेल्या एका मोठ्या आंदोलनाचाच भाग आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडी ममता बॅनर्जींच्या पाठीशी खंबीर!

निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी ‘इंडिया’ (INDIA Alliance) आघाडीसोबत नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या निकालांनंतर संपूर्ण आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

  • प्रमुख नेत्यांचे फोन: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
  • “आम्ही सर्वजण या लढाईत तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही या नेत्यांनी दिली असून, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली ताकद देशाला दाखवून देतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा ‘गुलाम’: राऊतांचा घणाघात

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आता एकत्र येण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले. “निवडणूक आयोग आता सत्ताधारी पक्षाचा ‘गुलाम’ झाला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात निवडणुका लढवायच्या की नाही, याचा विचार सर्व विरोधी पक्षांना करावा लागेल,” असे गंभीर विधान त्यांनी केले.

सत्ताधाऱ्यांमधील ‘जगजीवन राम’ बाहेर पडतील! : संजय राऊत यांनी भाजपमधील नाराज नेत्यांनाही साद घातली आहे. “ज्याप्रमाणे आणीबाणीच्या काळात बाबू जगजीवन राम यांच्यासारखे मोठे नेते हुकूमशाहीविरुद्ध बंड करून बाहेर पडले होते, तसेच आजही सत्ताधारी पक्षात काही प्रामाणिक लोक आहेत ज्यांना सध्याची परिस्थिती पटत नाही. अशा नेत्यांनाही ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले जाईल,” असे राऊत म्हणाले.

“नितीश कुमारांचे भाकीत ममतांनी आधीच केले होते”

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, ते पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत. पाटणा येथील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या बैठकीत जेव्हा नितीश कुमार यांना समन्वयक करण्याचा प्रस्ताव आला होता, तेव्हाच ममता बॅनर्जी यांनी, “हे नेते फार काळ टिकणार नाहीत, ते कधीही पलटी मारतील,” असे स्पष्ट सांगितले होते. नितीश कुमारांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

तसेच, पश्चिम बंगालमध्ये जर काँग्रेसने तृणमूल काँग्रेससोबत योग्य जागावाटप आणि समन्वय साधला असता, तर आज निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळे आणि विरोधी पक्षाच्या बाजूने दिसले असते, अशी खंतही संजय राऊत यांनी शेवटी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:39 06-05-2026