चिपळूण : चिपळूण न.प. प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांच्या वार्षिक चतुर्थ आकारणी सर्वेक्षणअंतर्गत केलेले कर निर्धारण नियोजन खासगी ठेकेदारामार्फत केले असून सुमारे अडीच कोटी रूपये या कामासाठी निविदा पद्धतीने खर्च केले आहेत. मात्र, मालमत्ता धारकांची कर आकारणी व मोजणी सदोष असल्याने मालमत्ता धारकांवर अन्याय झाला आहे. या बाबत आपण नगररचना विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांना वाढीव कर रक्कमेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणार आहोत. दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी या बाबत तक्रारदारांचे फेर सर्वेक्षण केले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी आ. रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आ. रमेश कदम यांनी सांगितले की, प्रशासनाने गतवर्षी निविदा पद्धतीने परजिल्ह्यातील खासगी ठेकेदारामार्फत चतुर्थ श्रेणी आकारणी अंतर्गत मालमत्तांचे सर्वेक्षण केले. यासाठी सुमारे दोन ते अडीच कोटींचा खर्च आला. त्याचवेळी काही लोकप्रतिनिधींनी या विषयाला विरोध केला होता. तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील या विषयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे सर्वेक्षणांतर्गत कर मागणी रक्कमांची देण्यात आलेली घरपट्टी जुन्या कर मागणीनुसार दिली गेली. परंतु आता यावर्षी सर्वेक्षण झालेल्या नव्या आकारणीनुसार कर रक्कम मागणीची घरपट्टी देण्यात आली आहे. परंतु ती आकारणी व रक्कमेची मागणी सदोष असल्याचे नागरिकांच्या तक्रारीवरून दिसून येत आहे.
मुळात सर्वेक्षण करणारी संस्था परजिल्ह्यातील असल्याने त्यांना चिपळुणातील भौगोलिक परिस्थितीची कल्पना नाही. त्याचप्रमाणे आकारणी करताना आवश्यक असणाऱ्या धोरणात्मक नियमावलींचे पालन झालेले नाही. सरसकट मोजणी करून कर आकारणी केल्याने सुमारे अठरा हजारहून अधिक सदनिकाधारकांना ज्यादा कराचा फटका बसणार आहे. अशा सर्व संबंधितांसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बाबत संबंधित तक्रारदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यात संबंधितांकडून समाधानकारक व योग्य माहिती मिळाल्यास आकारणी रक्कमे बदल होणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत संबंधित तक्रारदारांनी अर्ज करावयाचे आहेत व आपली बाजू सुनावणी दरम्यान मांडायची आहे. ही सुनावणी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली जाणार आहे. मात्र, ज्यांना या संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी अडचण येत असेल व अधिक माहिती हवी असेल तर संबंधितांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कदम यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 21/Dec/2024