रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना सहलीसाठीही प्रासंगिक कराराच्या एसटी सेवेतही सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात २०१८ सालापासून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासनामार्फत सवलती देण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. यावर्षी ज्येष्ठ नागरिकांना मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना सवलती जाहीर केल्या आहेत. ७५ वर्षे वयावरील ज्येष्ठांना एसटी बसमधील प्रवास पूर्णतः निःशुल्क केला आहे. तसेच ज्येष्ठांना धार्मिक स्थळे पाहण्यासाठीही विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्यात महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिकांची फेस्कॉम ही मान्यताप्राप्त संघटना आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघ या शिखर संघटनेशी संलग्न आहेत. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी आपल्या सभासदांसाठी किमान एक सहल आयोजित करतो. ज्येष्ठांचा प्रवास आरामदायी होऊन त्यांना सहलीचा आनंद लुटता यावा, यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था केली जाते. तशी विनंती केल्यास एसटीकडून स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जाते. मात्र या प्रासंगिक करार बसच्या भाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघांना कोणतीही सवलत मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठांना या प्रवासासाठी मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात शासनाकडून ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती निव्वळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या प्रासंगिक करारावरील बस गाड्यांनाही देण्यात याव्यात, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 21-12-2024
