युवकांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता : पद्मश्री दादा इदाते

मंडणगड : युवकांमध्ये प्रचंड शक्ती असते; परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्याकरिता अशी शिबिरे आयोजित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. आपला देश हा खेड्यापाड्यांचा देश आहे. खेड्यातील समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काय करता येईल. याचा विचार करून त्या आपल्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न करावा. ग्रामजीवनाची अनुभूती आपल्या जीवनाला दिशा देत असते. म्हणून या संधीचा फायदा घेऊन शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी समरस होऊन गावच्या विकासाला हातभार लावावा, असे प‌ कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना सांगितले.

येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सुर्ले येथे श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम तथा भाऊ इदाते होते. तर अतिथी म्हणून मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे उपस्थित होते. यावेळी संचालक आदेश मर्चडे, सरपंच रोशनी दिवेकर, पोलिस पाटील वृषाली शिंदे, ग्रामसेविका गीता शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष आप्पा मोरे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश शिंदे व कल्पेश शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले, लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी रासेयो शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व गावच्या सर्वांगीण विकासाकरिता या शिबिराचा लाभ करून घेण्याविषयी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

प्रमुख अतिथी तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी आपल्या विद्यार्थिदशेतील शिबिराचा अनुभव कथन करताना ते म्हणाले, की यातून जी एक शिस्त लाभते ते आपण कधीच विसरू शकत नाही. ग्राम जीवनाची आपल्याला जाणीव होते. श्रम प्रतिष्ठा, सर्वधर्मसमभाव यासारखे मूल्य रुजविले जातात. यातून शिबिरार्थिना सर्वसमावेशक व विशाल दृष्टी लाभते. कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही प्रकारचे आव्हान आपण सहज पेलू शकतो. यावेळी त्यांनी शिविरार्थीना स्पर्धा परीक्षा तयारीबाबत माहिती दिली. आनंदाने शिकले की ते अधिक दीर्घकाळ लक्षात राहते, असेही त्यांनी शिबिरार्थिना मार्गदर्शन करताना सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कार्याध्यक्ष श्रीराम इदाते म्हणाले, आयुष्य बदलण्यासाठी या शिबिराचा फायदा होणार आहे. मिळालेल्या अनुभवाची शिदोरी कधीही न संपणारी आहे. फक्त प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडून समाजाला चांगला संदेश या माध्यमातून दिला, तर शिबिरामध्ये सहभागी झाल्याचे सार्थक होईल. म्हणून शिविरार्थिनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:26 PM 24/Dec/2024