रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

रत्नागिरी : जानेवारी महिन्यात रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे येणार आहेत, तसेच राज्यातील महत्त्वाचे नेते, मराठा समाजातील विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करणारे व्यक्तिमत्त्व सहभागी होणार आहेत. मराठा तितुका मेळवावा, मराठा समाज एकत्र येण्यासाठी आणि राष्ट्रकार्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी हे महासंमेलन दिशादर्शक ठरेल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, सल्लागार सतीश साळवी, मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील तथा अप्पा देसाई आणि सचिव प्रताप सावंत-देसाई उपस्थित होते. विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्थांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारीला हॉटेल विवेक येथे मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित केले आहे. देशातील ५५ मराठा मंडळांचे दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सहआयोजक येथील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने अॅड. सतीश माने-शिंदे, इंद्रजित सावंत, प्रज्वल चव्हाण, विश्वास नांगरे-पाटील, वैशाली जोंधळे, सुरेश हावरे, उज्ज्वल साठे अशा अनेक नामवंत व्यक्ती रत्नागिरीत येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात मराठ्यांनी नाव कमावले आहे, अशा व्यक्तींनी यायचे कबूल केले आहे. पाहुण्यांची निवास व भोजनव्यवस्था, मनोरंजनपर कार्यक्रम, उद्बोधक परिसंवाद, व्याख्याने, उद्योजकांच्या मुलाखती यांचे आयोजन केले आहे. हे महासंमेलन यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ व मराठा मंडळाचे पदाधिकारी, महिला, तरुण, ज्येष्ठ नियोजन पद्धतीने मेहनत घेत आहेत.

गावागावांत बैठका
संमेलनाला सर्वच मराठा आमदार, पुढारी, नेते सहभागी होणार आहेत. गावागावांतील मराठा मंडळे स्वागताच्या जय्यत तयारीला लागले असून, या संमेलनाच्या प्रचारासाठी गावागावांत बैठका घेतल्या जात आहेत. जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 25/Dec/2024