रत्नागिरी – मुंबई, पुण्यात एक दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते; परंतु कोकणातील महिला हंडाभर पाण्याकरीता दोन किमी उन्हातून पायपीट करते, याची वेदना कोणालाच नाही. त्यामुळे कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवा आणि मग मराठवाड्याला पाणी द्या, अशी स्पष्ट भूमिका कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रश्नी न्यायाची भूमिका घेतील, ही कोकणवासीयांची अपेक्षा व्यक्त केली.
कोकणच्या वाट्याचे पाणी वळवले तरी मराठवाडा अखेर तहानलेलाच राहील. जनतेला स्वप्नात गुंतवून काहीच निष्पन्न होणार नाही. कोकणात समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा मनोदय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोलून दाखवला. त्यासंदर्भात अॅड. पाटणे यांनी कोकणची बाजू मांडली आहे.
विखे-पाटील यांनी अहिल्यानगर येथे स्वागताच्या कार्यक्रमात वरील विचार व्यक्त केला होता. तसेच कोकणचे वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणण्याचे माझे स्वप्न आहे, असेही सांगितले. यापूर्वी जयंत पाटील यांनी सांगलीसाठी कृष्णेत पाणी सोडा, अशी विधानसभेत मागणी केली होती. आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या ही योजना परवडणारी नाही. समुद्रसपाटीपासून कोकणची उंची सर्वसाधारणपणे ८० मिटर, रत्नागिरीची ५८ मीटर, तर मराठवाड्याची उंची ५६८ मीटर आहे. म्हणूनच खताळ कमिशनने अहवालात योजनेला विरोध केला होता. असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.
अॅड. पाटणे म्हणाले, महाराष्ट्रात ऊस लागवडीचे क्षेत्र जेमतेम साडेपाच लाख हेक्टर असून, एकूण लागवड जमिनीपैकी ऊस क्षेत्र ३ टक्के आहे, मात्र ऊस लागवडीसाठी सिंचनाचे तब्बल ६० टक्के पाणी वापरले जाते. महाराष्ट्रातील केवळ ३.४ टक्के शेतकरी ऊस, केळी, द्राक्ष आणि संत्री पिकवितात, मात्र पाणी उपसा प्रचंड करतात. शहरात तथाकथित उच्चभ्रू समाज पाण्याची प्रचंड नासाडी करतात. पाण्याचा पुरवठा करणारे प्रकल्पावर एक लक्ष कोटी खर्च झाले आहेत, परंतु याचा लाभ मुख्यत्वे ५ टक्के शेतकरी व १० टक्के लोकसंख्येला होतो.
१९५२ पासून पाण्याचा प्रश्न
कोयना धरणाचे काम पूर्ण होऊन ५० वर्ष होत आली. हेळवाक येथून वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी साधारण: १९०० दशलक्ष घनमीटर इतके आहे. १९५२ मध्ये पं. नेहरूनी वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करायचा, असा मूलगामी प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर कोकणी माणूस अद्याप शोधत आहे. लोटे-परशुराम येथील एमआयडीसी व एन्रॉन वगळता सर्व कोयनेचे पाणी वशिष्ठीमार्गे दाभोळ येथे समुद्राला मिळते. वाशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 25-12-2024














