सावर्डे : तुरंबव येथील शारदादेवीचे मंदिर म्हणजे दक्षिणात्य स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिरात श्री शारदादेवीबरोबरच श्री वरदानदेवी, श्री मानाईदेवी आणि श्री चंडिकादेवी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. नवरात्र काळात या देवींच्या रूपीच्या मूर्तीबरोबरच गौराईदेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या रुपाच्या मूर्तीची व गौराईदेवीची प्रतिष्ठापना करून या मूर्तीना वस्त्रालंकारनी सजविले जाते. विजयादशमीपर्यंत नऊ दिवस हा साज भाविकांच्या मनाला एक वेगळाच आनंद देतो. प्रेक्षणीय विद्युत रोषणाई, विलोभनीय निसर्गसौंदर्य, फुलांची आरास यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनाला भुरळ घालते. सकाळी ८ ते रात्री ११.३० पर्यंत अविरतपणे दर्शन फेरी चालू असते. रात्री नऊ वाजता देवीची महाआरती होते. तसेच १०.३० व ११.३० ला जाखडी नृत्याला सुरुवात होते. परंपरागत वेशभूषेत सादर केलेले हे जाखडी नृत्य म्हणजे लोककलेचा एक वेगळाच आविष्कार असतो. हे सर्व पाहण्यासाठी भाविकांची नऊ दिवस गर्दी उसळते. रात्री साडेअकरानंतर संततीविषयक नवस करणे व ते फेडणे याची मंदिरात रीघ लागलेली असते. रात्री ११.३० नंतर येणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
श्री शारदादेवीच्या नवरात्रोत्सव दि. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. श्री शारदादेवीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथून पश्चिमेकडे साधारणपणे ११ किलोमीटर अंतरावर तुरंबव या निसर्गरम्य गावी शारदादेवीचे मंदिर आहे. नवरात्रौत्सव काळात बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व भाविकांची श्री शारदादेवी मंदिर परिसरात भक्त निवासाची उत्तम सोय आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने चिपळूण तुरंबव व सावर्डे तुरंबव या बस फेऱ्या सुरू असतात. पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो.’ विजयादशमीला संध्याकाळी मंदिरासमोरील प्रांगणात सामुदायिक सोने लुटण्याचा सोहळा होतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 28/Sep/2024