रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास नॅकच्या टीमने भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर या महाविद्यालयास २ सीजीपीए गुणांकनासहित ‘क’ श्रेणीचे मानांकन प्राप्त झाले आहे.
तीन सदस्यीय नॅक पिअर टीमने देव, घैसास, कीर महाविद्यालयास भेट दिली. या समितीमध्ये प्रमुख म्हणून प्रा. प्रदीप्ताकुमार मोहपात्रा (डीन, रावणशा युनिव्हर्सिटी, ओरिसा), समन्वयक म्हणून प्रा. सुशील कुमार शर्मा (मिझोराम युनिव्हर्सिटी) आणि सदस्या म्हणून डॉ. सोवरानी सरमाह (प्राचार्य, जॉयगोगाई कॉलेज, आसाम) होते. दोन दिवसांच्या भेटीत या टीमने महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक विभागांची तपासणी केली, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
संस्थेच्या सुविधांचा आढावा घेतला. ग्रंथालय, प्रयोगशाळा, राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष, क्रीडा, सांस्कृतिक कामकाज आणि इतर शिक्षण साधने, अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती, शैक्षणिक अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि अध्यापन पद्धतीवर चर्चा केली. संशोधन आणि विकासाबाबत संस्थेच्या संशोधन उपक्रमांचे मूल्यांकन केले आणि भविष्यातील संधींवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सुविधांचा आढावा घेऊन त्यांचे अभिप्राय समजून घेतले.
नॅकच्या टीमने २०१८ ते २०२३ या पाच वर्षांतील अध्यापन, अध्यापनेतर व प्रशासकीय कामकाजाची गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून कागदपत्रांची तपासणी केली. याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महाविद्यालयीन गुणात्मक बाबींशी चर्चा केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, सहकार्यवाह विनय परांजपे, सहकार्यवाह संजय जोशी, खजिनदार नचिकेत जोशी, संस्थेचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर केळकर, विनायक हातखंबकर व इतर सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे देणगीदार रमेश कीर, शिक्षणतज्ञ डॉ. किशोर सुखटणकर, उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, डॉ. श्रीरंग कद्रेकर (माजी कुलगुरू कृषी विद्यापीठ, दापोली) हेही यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाने अवघ्या आठ वर्षांत नॅकच्या पहिल्या फेरीचे केंद्रीय मूल्यांकन प्रेरणास्थान व पाठबळ असणाऱ्या भारत शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या झाले. यात भारत शिक्षण मंडळ संस्था, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शिक्षणतज्ज्ञ डॉ. किशोर सुखटणकर व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. अतुल पित्रे, सर्व घटक संस्था प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
नॅकच्या मानांकनासाठी परिश्रम घेणारे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. निलोफर बन्नीकोप, प्रा. ऋतुजा भोवड, प्रा. विनय कलमकर, प्रा. राखी साळगावकर, प्रा. वैभव घाणेकर, प्रा. गौरी बोटके, सौ. मनस्वी साळवी, अभिषेक रहाळकर, महेश रेवाळे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी-माजी विद्यार्थी व पालक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचा या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 28-09-2024