संगमेश्वर/देवरुख: रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या एका आंतरजिल्हा चोरीच्या टोळीचा संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथून चोरलेली ‘इको’ कार कोल्हापुरातील बांबवडे येथील ३ सराफी दुकाने फोडण्यासाठी वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी कार जप्त केली असली तरी, सराईत चोरट्यांची टोळी अद्याप पोलिसांना चकवा देत फरार आहे.
बुरंबीतून कारची चोरी आणि गुन्ह्याचा मास्टरप्लॅन
दोन दिवसांपूर्वी बुरंबी येथील मारुती नागेश सुतार यांची मारुती सुझुकी इको (MH-08-Z-4703) ही गाडी त्यांच्या घराबाहेर उभी होती. अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास अत्यंत कौशल्याने ही गाडी लंपास केली. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कोल्हापुरात ३ सराफी दुकाने फोडली
चोरट्यांनी ही कार केवळ पळवण्यासाठी नव्हे, तर एका मोठ्या गुन्ह्यासाठी चोरली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आले की, चोरट्यांनी चिपळूणमार्गे कराड ओलांडून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. मंगळवारी मध्यरात्री शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे याच इको गाडीचा वापर करून चोरट्यांनी ३ सोन्याची दुकाने फोडली आणि सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांचा पाठलाग आणि चोरट्यांची हुलकावणी
संगमेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे वेगाने हालचाली सुरू केल्या होत्या. पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी महामार्ग टाळून अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा वापर केला. अखेर कोल्हापूरजवळील केर्ले गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला चोरीची इको गाडी बेवारस सोडून चोरटे पसार झाले.
संगमेश्वर पोलिसांचे यश, पण टोळी फरार
गाडी चोरीला गेल्यापासून अवघ्या ४८ तासांच्या आत संगमेश्वर पोलिसांनी गाडीचा शोध लावून ती ताब्यात घेतली आहे. मात्र, ही टोळी अत्यंत सराईत आणि नियोजनबद्ध काम करणारी असल्याचे दिसून येत आहे. या टोळीने पोलिसांना चकवा देण्यासाठी अंतर्गत मार्गांचा वापर केला असून, आता पोलीस या फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने तपास करत आहेत.
या कारवाईमुळे चोरीला गेलेली गाडी मिळवण्यात यश आले असले, तरी सराफी दुकाने फोडणाऱ्या टोळीमुळे व्यापारी वर्गात अद्याप भीतीचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 01-05-2026














