आयसीएसई, आयएससी दहावी व बारावीचे निकाल जाहीर

नागपूर : काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) बाेर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आले.

ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालात शहरातील जवळपास सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. दहावीच्या परीक्षेत आरव साळवे, सारक्षी पाटील व हुसैना नजीब अव्वल ठरले, तर बारावीमध्ये हर्षकुमार द्विवेदी, रुद्राक्ष राऊत, हुसैना इजी आणि इनसिया अंबावाला यांनी बाजी मारली. यंदा शहरातील सर्व शाळांचा निकाल समाधानकारक राहिला.

निकाल दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. याची माहिती मिळताच विद्यार्थी आपला निकाल जाणून घेण्यासाठी शाळांमध्ये दाखल झाले. उत्तम गुण पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गुरुजनांचे आशीर्वाद घेत त्यांनी आनंद साजरा केला. आयसीएसई बाेर्डात दहावीचे जवळपास १००० आणि बारावीमध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

दहावीच्या परीक्षेत एसएफएफ स्कूल ऑफ एक्सलन्स, सेमिनरी हिल्स येथील आरव अश्विनीकुमार साळवे याने ९७.२ टक्के गुण मिळवले. त्याचप्रमाणे चांदादेवी सराफ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सारक्षी अमाेल पाटील हिने ९७ टक्के आणि एमएसबी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या हुसैना नजीब हिनेही संयुक्तपणे ९७ टक्के गुण मिळवले. याशिवाय काव्या मेश्राम (९६.२ टक्के), अरमान शेख (९५.६ टक्के), शौर्य चंदनखेड़े (९५.२ टक्के), संस्कार गाैतम रंगारी (९५ टक्के, सेव्हन्थ डे स्कूल), शौर्य साहू (९४.८ टक्के) आणि अनुश्का बिडकर (९४.६ टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

सीडीएसच्या विद्यार्थ्यांचे शानदार यश
त्याचप्रमाणे आयएससी बारावीमध्ये विज्ञान शाखेत चंदादेवी सराफ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या हर्षकुमार विरेंद्रकुमार द्विवेदी याने ९५ टक्के, रुद्राक्ष निलेश राऊत याने ९१ टक्के, ईक्षितराव विन्नाकाेटा याने ९० टक्के, आर्या बिडकर हिने ८६ टक्के आणि शिवांश पटेल याने ८३ टक्के गुण मिळवले. कला शाखेत एमएसबी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या हुसैना इजी हिने ९२.२ टक्के, तर इनसिया अंबावाला हिने ९४ टक्के गुण मिळवले. शहरात बारावीच्या शाळा तुलनेने कमी असल्या तरी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजनांसोबत आपल्या यशाचा आनंद साजरा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 01-05-2026