रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २६ डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत ‘जलउत्सव से जलबंधन’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना प्रतिदिनी, प्रतिमानसी गुणवत्तापूर्वक ५५ लिटर या प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत गावे हर घर जल म्हणून घोषित करावयाचे असून या मिशनमध्ये कार्यात्मक घरगुती नळ जोडणीवर भर देण्यात येणार आहे.
हे अभियान राबवताना शासनाच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणीकरिता विलंब होत आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता २६ डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘जल उत्सव से जलबंधन’ या मोहिमेंतर्गत ग्रामस्थांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त गावे केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये मासिक मोहिमेचे नियोजन, संनियंत्रण करणे, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, योजनांविषयी सविस्तर सद्यस्थितीबाबत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सेवा पुरवठादार यांची संयुक्त बैठक नियोजन, कार्यात्मक नळ जोडणी कार्यवाही करून आधार कार्ड केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंद करणे, योजनेंतर्गत भौतिक सुविधेचे जिओ टॅगिंग करणे, अंगणवाडी व सार्वजनिक इमारतींना नळ जोडणीची पाहणी करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
विशेष ग्रामसभांचे आयोजन…
सद्यस्थितीमध्ये जी गावे भौतिकदृष्ट्या पूर्ण असून त्यांच्या कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची शंभर टक्के नोंदणी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरती झालेली आहे, अशी गावे विशेष ग्रामसभा घेऊन तत्काळ घोषित करण्यात यावी, असे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 26/Dec/2024












