रत्नागिरी : सर्व प्रकारच्या औद्योगिक व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची (आयसीसी) स्थापना करण्याच्या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी दिली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हा आढवा घेतला होता. त्यावेळी खासगी आस्थापनांमध्ये या समिती स्थापना करण्याबाबत उदासीनता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. प्रत्येक क्षेत्रात महिलांची संख्या वाढू लागली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितरित्या मोकळेपणाने काम करता यावे, कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत असल्यास अथवा त्यांच्यासाठी असुरक्षिततेचे वातावरण असल्यास त्यांना न्याय मागता यावा, या उद्देशाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या औद्योगिक व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापनांमध्ये समितीची स्थापना करण्याबाबत जागृती करण्याचे काम विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.
या समित्यांच्या सदस्यांना या कायद्याबाबत परिपूर्ण माहिती असेल तरच ती समिती याबाबत योग्य न्यायनिवाडा करू शकेल. या दृष्टीने या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन या कायद्याविषयी माहिती दिली जाणार आहे. शाळा महाविद्यालय महिला-मुलींचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व कार्यालयामध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. या कार्यालयांपैकी अद्याप ज्यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली नाही, त्यांनी तातडीने समिती स्थापन करावी. असे आवाहन सातव यांनी केले.
विविध उपक्रम राबविणार
बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो याचीही प्रभावीपणे अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने समाजात जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही प्राधिकरणाचे सचिव सातव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 27/Dec/2024