मुंबई : राज्यातील पत्रकारांची सर्वात मोठी आणि प्रमुख संघटना असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांची मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्याकडून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत वणजु यांनी यापूर्वी जिल्ह्याची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी देखील पत्रकारांसाठी धडाकेबाज काम करत संपूर्ण राज्यात रत्नागिरी तालुक्याला उत्कृष्ट तालुका म्हणून मान मिळवून दिला होता. याच कारकिर्दीत लायन्स क्लब रत्नागिरी च्या सहाय्याने वांद्री गाव दत्तक घेत या ठिकाणच्या ६५ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात आल्या होत्या. या सर्व कामाची दखल आता राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेत आता परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी हेमंत वणजु यांची निवड करीत मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.
हेमंत वणजु यांची परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड होताच त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तसेच हेमंत वणजु यांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 27-12-2024












