राजापूर : तालुक्यातील प्रसिध्द अशा उन्हाळे येथील गंगातीर्थ क्षेत्राचा रखडलेला विकासाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आमदार किरण सामंत यांनी या प्रश्नी महालक्ष्मी गंगातीर्थ विकास मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच गंगासंस्थानचे गंगापुत्र व पदाधिकारी यांच्याशी संयुक्त बैठकीत चर्चा करून यावर यशस्वी तोडगा काढला आहे. स्थानिक ग्रामस्थ व गंगापुत्र यांची संयुक्त समन्वय समिती गठीत करून या समन्यय समितीच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली गंगतिर्थ विकासाचे काम मार्गी लावण्याचा निर्णय या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे गेली कित्येक वर्षे रखडलेले गंगातीर्थ विकासाचे काम आता मार्गी लागणार आहे. या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ व गंगापुत्र यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेबद्दल आ. सामंत यांनी धन्यवाद देत भविष्यात गंगातीर्थ व उन्हाळे येथील गरम पाण्याचे कुंडस्थळ विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.
राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील प्रसिध्द असलेल्या गंगातीर्थ क्षेत्राचा विकास व्हावा अशी गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थ, गंगापुत्र व पर्यटकांची मागणी आहे. यासाठी शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडलेले होते.

यावर आमदार किरण सामंत यांनी बुधवारी स्थानिक ग्रामस्थ, गंगापुत्र व प्रशासकिय अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रखडलेल्या गंगातीर्थ विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आ. सामंत यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने महालक्ष्मी गंगातीर्थ विकास मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पुजारे व पदाधिकारी व ग्रामस्थ व गंगासंस्थानचे मंदार सप्प्रे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतले. यावेळी उपस्थितांनी गंगातीर्थ क्षेत्राचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका मांडली. स्थानिक ग्रामस्थांनी आंम्हा स्थानिकांना विश्वासात घेऊन विकास झाला पाहीजे असेही नमुद केले. गंगातीर्थ विकासाबरोबरच उन्हाळे येथील गरम पाण्याचे कुंड क्षेत्राच्या विकासासाठीही निधी द्यावा अशी मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी केली. तर गंगासंस्थानच्या वतीने रूढी परंपरा यांचे जतन करून विकास झाला पाहिजे अशी भूमिका मांडली.
यावर बोलताना आ. सामंत राजापूर तालुक्यातील एक जागरूक व प्रसिध्द असे हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाचा सर्वांगिण विकास करणे हेच तुमचे आमचे सर्वांचे ध्येय आहे. दोघांनाही विश्वासात घेऊन व तुमच्या समन्वयातुनच विकास काम मार्गी लावले जाईल असेही आ. सामंत यांनी यावेळी नमुद केले. महालक्ष्मी गंगातीर्थ विकास मंडळ व स्थानिक ग्रामस्थ तसेच गंगापुत्र यांची एक संयुक्त समन्वय समिती गठीत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे समन्वयातुन गंगातीर्थ विकासाचे काम मार्गी लावावे अशा सुचना आ. सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर स्थानिकांच्या मागणीप्रमाणे उन्हाळे येथील गरम पाण्याचे कुंड क्षेत्राच्या विकासासाठीही आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ. जैसमिन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई, राजापूर तहसीलदार दीपाली पंडीत, सार्वजनिक बांधकाम राजापूरचे उपअभियंता श्री. कांबळे, उन्हाळे तलाठी, ग्रामसेवक यांसह पर्यटन विभागाचे अधिकारी, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, महादेव गोठणकर, दीपक बेंद्रे आदींसह उन्हाळेतील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
गेले कित्येक वर्षे रखडलेल्या या गंगातीर्थ विकासाच्या कामाबाबत यशस्वी मध्यस्ती करत आ. सामंत यांनी तोडगा काढून हे काम मार्गी लावतानाच आवश्यक तो वाढीव निधीही उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने आता राजापूरातील या महत्वपुर्ण अशा पर्यटन स्थळाचा विकास होणार असून राजापूरच्या वैभवात भर पडणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 27/Dec/2024












