रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील तीन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या. त्यामुळे पालिकेच्या रिक्त पदांमध्ये आणखी भर पडली आहे. यामध्ये उपमुख्याधिकारी, अभियंता आणि मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांची चिपळूण पालिकेत बदली झाली. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांची खोपोली पालिकेत बदली झाली. त्यांच्याकडे रत्नागिरी पालिकेच्या पाणी विभागासह आरोग्य विभागाचा कार्यभार होता. मालमत्ता विभागातील अधिकारी नंदकुमार पाटील यांची गडहिंग्लज येथे बदली झाली आहे. त्यांच्याकडे मालमत्ता विभागासह पाणीपट्टी वसुली विभागाचा कार्यभार होता. पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागांचा कार्यभार कंत्राटी कामगार सांभाळत आहेत. त्यात आता तीन अधिकाऱ्यांची बदली झाल्याने पालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.