रत्नागिरी जिल्ह्यात ‘झीरो ॲक्सिडेंट ड्राइव्ह’ सुरू!

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा

रत्नागिरी जिल्ह्यात ‘झीरो ॲक्सिडेंट ड्राइव्ह’ सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प पोलीस प्रशासनाने सोडला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेनुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान १ जून ते ८ जून २०२६ या अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीत वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करत हजारो बेजबाबदार वाहनधारकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

मद्यपी आणि अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

या ८ दिवसांच्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) तब्बल ४०१ वाहन चालकांविरुद्ध गुन्हे नोंदवून कडक कायदेशीर कारवाई केली आहे. याशिवाय महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या १७३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १६२ प्रकरणांमध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १० चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजागृती मोहीम

केवळ दंडात्मक कारवाई न करता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष जनजागृती कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्थानिक शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी थेट संवाद साधून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

हातखंबा आणि भोस्ते घाटात अपघात प्रतिबंधक उपाययोजना

रस्त्यांची रचना सुधारण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाशी विशेष समन्वय साधण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील आणि अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या हातखंबा (रत्नागिरी) तसेच भोस्ते घाट (खेड) येथे आवश्यक वाहतूक सुरक्षितता उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात आल्या आहेत. या संभाव्य अपघात क्षेत्रांमध्ये सूचना फलक, वेगमर्यादा फलक आणि दिशादर्शक बसवण्यात आले असून, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स (Rumble Strips) देखील बसवण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, ‘झीरो ॲक्सिडेंट ड्राइव्ह’ अंतर्गत येत्या काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवणे पूर्णपणे टाळावे, ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा व चारचाकी चालवताना सीट बेल्टचा अनिवार्य वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. रस्ते अपघातमुक्त करण्यासाठी जनतेने पोलीस दलाला सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 11-06-2026