रत्नागिरी : चौकशीअंती दोषी ठरलेल्या दसुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक वैशाली लिंगायत व संगणक परिचालक अमित कदम यांना तत्काळ पदावरून काढून टाकण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनी देऊनही ते अद्यापही कार्यरत असल्याने ते कोणाच्या वरदहस्ताने कार्यरत आहेत?, असा सवाल दसूर ग्रामस्थांनी विचारला असून या दोघांवर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास व त्या अनुषंगाने गावामध्ये वाद निर्माण होऊन गावातील शांतता भंग होण्यासारखी घटना घडल्यास या सर्वस्वी परिणामांना संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार असतील, असा इशारा एका निवेदनाद्वारे दसूर ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामपंचायत दसूरमध्ये कार्यरत ग्रामसेवक वैशाली विकास लिंगायत आणि केंद्र चालक व अन्य पदावर असलेले अमित अनंत कदम यांच्या ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभारामुळे त्यांची बदली करण्याची मागणी दसूर ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली होती. याप्रकरणी विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, व ग्रामपंचायत प्रशासक पंचायत समिती, राजापूर यांनी साक्षी, पुराव्यांची पडताळणी करून ते दोषी असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतरही दोघेही दसूर ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असल्याचे ग्रामस्थांनी या निवेदनात म्हटले आहे.
ग्रामसेवक व संगणक परिचालक यांच्या गैरकारभाराबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार अर्ज तसेच गैरकारभाराचे साक्षी पुरावे सादर केले होते. त्याची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी ते दोषी असल्याचा अहवाल सादर केलेला असताना व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना या दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात आला आहे. जर या दोघांवर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास व त्या अनुषंगाने गावामध्ये वाद निर्माण होईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा दसूर ग्रामस्थांनी नव्याने निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनावर महंमद नुरमहमंद कालसेकर, मनोहर श्रीधर इंदुलकर, लक्ष्मण भास्कर सुर्वे, हेमंत आत्माराम सुर्वे यांसह बहुसंख्य ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.