नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीत मृगया, डिस्को डान्सर आणि गुंडा यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakroborty) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb FalkeAward) देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्काराने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
भारतीय सिनेमांचा सुपरस्टार
मिथुन चक्रवर्ती यांना मिठूदा असेही संबोधले जाते. 2024 मध्ये त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार ही मिळाला होता. शिवाय तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी मोहर उमटवली आहे. जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार अशी पदवी मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व असल्याची मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे.
डिस्को डान्सर ने भारतभर लोकप्रियता
1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली. ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.
दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळतो?
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व एक कोटी रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 30-09-2024