रत्नागिरी : नगरपालिकेची नळ पाणी योजना हि अजूनही पूर्ण झाल्याचे दिसत नाही. आज देखील शहराच्या अनेक भागातून पाणी टंचाई जाणवत आहे. डिसेंबर महिन्यात देखील शहराच्या काही भागात केवळ १५ मिनिटे पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. मग ६८ कोटींच्या नळ पाणी योजनेचा उपयोग काय ? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. (धरण उशाला आणि कोरड घशाला)
शिळ धरण ते जॅकवेल काम अपूर्ण
२०२३ साली शिळ धरण येथे असणारी जॅकवेल कोसळली. त्यानंतर शहराला काही दिवस पाणी नव्हते. नवीन जॅकवेल अत्यंत जलद गतीने कार्यन्वित करण्यात आली. मात्र शिळ धरण ते जॅकवेल हि जलवाहिनी टाकण्याचे काम मात्र मागेच पडले. पावसाळ्यात वाहिनी टाकण्याचे काम करणे शक्य नसते त्यामुळे धरणाच्या ओव्हरफ्लो मधून पंपाच्या सहाय्याने पाणी उचलण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर देखील नळपाणी योजनेच्या कामात दिरंगाई झाली. त्यातच या भागात टाकण्यात आलेली जलवाहिनी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यावर पुन्हा एकदा तात्पुरत्या व्यवस्थेवर हा ताण पडला. आज देखील याच पंपांच्या सहाय्याने शिळ धरणाच्या ओव्हरफ्लो मधून पाणी उचलण्यात येते.
पुरेसा पाउस पडूनही शहरात पाणी टंचाई
शिळ धरणाच्या ओव्हरफ्लो मधून पाणी उचलण्याची केलेली तात्पुरती व्यवस्था सध्या ओव्हरफ्लो कमी होत चालल्याने तोकडी पडत आहे. त्यामुळेच दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद ठेवून साळवी स्टॉप येथील टाक्यांची लेव्हल करावी लागत आहे. शिळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यावर्षी पुरेसा पाउस पडूनही शहरात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवत आहे. धरणात पाणी असूनही ते थेट जॅकवेल पर्यंत आणण्याचे काम रखडल्याने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
काम वेळेत पूर्ण न झाल्यास अल निनो चे संकट
मागील वर्षी देखील शहरात अशीच परिस्थिती होती. शिळ धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी कमी झाल्यावर पाणी खेचण्याची तात्पुरती व्यवस्था कमकुवत ठरते. यामुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा करता येणे शक्य नसते. अशावेळी अल निनो चे कारण देत शहराला एकआड एक दिवस पाणीपुरवठा केला जातो. डिसेंबर महिना संपला तरी नळपाणी योजनेच्या ठ्केदाराने शिळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन टाकण्याचे काम केले नाही. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास “अल निनो” सारखी कारणे नगरपालिकेला द्यावी लागतील असे जाणकार सांगतात. पावसात पाण्याच्या वाढणाऱ्या प्रवाहामुळे शिळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन टाकण्याचे काम काँक्रिटीकरण करून केले पाहिजे. तरच हि पाईपलाईन पुन्हा प्रवाहात वाहून जाणार नाही. या कामासाठी आता मात्र काहीच दिवस हातात आहेत. वेळेत हे काम पूर्ण न झाल्यास यावर्षी देखील मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला शहरवासियांना सामोरे जाऊ लागू शकते.
१५ दिवसात काम करण्याच्या सूचना : मुख्याधिकारी तुषार बाबर
हे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. ठेकेदाराला याबाबत पत्र देण्यात आले आहे अशी माहिती रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली आहे.














