गाड्यांचे क्रमांक १५०८७ व १५०८८ जाहीर; ठाणे अन् कल्याणच्या खासदारांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई व रत्नागिरी:
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एका नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवेला अखेर मंजुरी दिली आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि प्रवासाची चिंता बऱ्याच अंशी दूर होणार आहे.
खासदारांच्या सततच्या पाठपुराव्याला यश; रेल्वेमंत्र्यांचे आभार
कोकण रेल्वेवरील प्रवाशांची सतत वाढणारी गर्दी आणि मुंबई-कोकण दरम्यान अधिक सक्षम रेल्वे संपर्काची अत्यंत गरज लक्षात घेऊन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या नवीन सेवेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने मंजुरी दिली. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत यावर अंतिम निर्णय झाला. या निर्णयाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.
गाडी क्रमांक आणि ५१० किलोमीटरचा थेट प्रवास
रेल्वे मंत्रालयाने या नवीन दैनिक ट्रेनचे अधिकृत क्रमांक घोषित केले आहेत:
- गाडी क्रमांक १५०८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस (दररोज)
- गाडी क्रमांक १५०८८: सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (दररोज)
सुमारे ५१० किलोमीटर अंतराची ही नवी रेल्वे सेवा मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांना थेट, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाने जोडणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय रेल्वे लवकरच जाहीर करणार आहे.
‘या’ स्थानकांवर असणार प्रस्तावित थांबे
नवीन दैनिक एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीसाठी कोकणातील मुख्य स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे प्रस्तावित थांबे खालीलप्रमाणे असतील:
प्रस्तावित थांबे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार गती
या नवीन दैनंदिन रेल्वे सेवेमुळे कोकणातील पर्यटन, शिक्षण, व्यापार आणि रोजगाराला मोठा बूस्ट मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे पर्यटकांसाठी आता अधिक सुलभ होईल. वाढलेली प्रवासी क्षमता आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला व लघू व्यवसायांना नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 03-08-2026














