Kolhapur Balumama Mandir Scam: आदमापूरच्या श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान समितीत ६०.७५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार

बाळूमामा मंदिर घोटाळा प्रकरणी उपनिबंधकांसह इतरांवर गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू

बाळूमामा मंदिर घोटाळा प्रकरणामुळे राज्यातील धार्मिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रातील तमाम भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीत तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. देशातील राम मंदिरातील आर्थिक वादाचे पडसाद संसदेत उमटलेले असतानाच, आता कोल्हापुरातील या प्रसिद्ध देवस्थानातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईला वेग आला आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रमुख निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके (उपनिबंधक), सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येताच संशयित आरोपी तथा उपनिबंधक रागिणी खडके या फरार झाल्या आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. संशयितांनी आपसात संगनमत करून, पूर्वनियोजित कारस्थान रचून देवस्थानची आणि भाविकांची विश्वासघाताने फसवणूक केल्याचा स्पष्ट उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती केवळ देवस्थान समितीपुरती मर्यादित नसून यात प्रशासकीय सहभागाचे गंभीर आरोपही समोर येत आहेत. या संपूर्ण ६०.७५ कोटींच्या घोटाळ्यामागे तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांचाही गंभीर हात असल्याचा थेट आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात आणखी काही मोठ्या नावांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घोटाळ्याचे गांभीर्य आणि अफाट रक्कम लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील सर्व धागेदोरे शोधण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने पडताळणी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सखोल तपास करत असल्याचे जिल्हा प्रमुख निलोत्पल यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 03-08-2026