रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये राबवण्यात येणार असून, या वर्षी ‘स्वच्छता ही सेवा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’, अशी थीम निश्चित केली आहे.
त्या अनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हा स्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 18 सप्टेंबर रोजी सफाई मित्र, सुरक्षा शिबीर या उपक्रमांद्वारे सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक केंद्रे, बाजारपेठ, ऐतिहासिक वस्तू, नदी घाट, समुद्रकिनारी स्वच्छता, 20 सप्टेंबर रोजी खाऊगल्ली येथे स्वच्छतेची मोहीम त्याचबरोबर कचर्याची विल्हेवाट लावणे, 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांत पथनाट्ये व कलापथकांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
दि. 22 सप्टेंबर रोजी प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 23 सप्टेंबर रोजी सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवण्यात येणार आहे. 24 सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड, स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. गावामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याबाबत स्पर्धा घेण्यात येणार आहे. गावातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन स्वच्छ माझे अंगण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कुटुंबास प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. या अभियानात गाव स्तरावर गणेशोत्सव मंडळे, महाविद्यालय, शाळा, एनएसएस विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शासकीय-निमशासकीय कार्यालयांचा सहभाग घेऊन दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 17-09-2024