रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधीत एसटी वाहतूक बंद पडली आणि दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यानंतर मालगुंड एज्युकेशन सोसायटीने धाडसी निर्णय घेत सायकल बँक उपक्रम सुरू केला. ५० सायकल विकत घेतल्या आणि लांबून येणाऱ्या मुले-मुलींना दिल्या. आजच्या घडीला त्यांच्या या उपक्रमात १७५ सायकल असून जिथून गाडीची सोय नाही तिथून सायकल घेऊन मुलांचे शिक्षण सुरू आहे. मालगुंड, जाकादेवी आणि काजुली (ता. गुहागर) येथील शाळेत हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीची स्थापना १० ऑक्टोबर १९४० ला झाली असून ८४ वर्षे संस्था शिक्षणाचा यज्ञ चालवत आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर आहेत. या उपक्रमाविषयी संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी सांगितले की, कोरोनानंतर लगेचच संस्थेने स्वखर्चाने जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय आणि मालगुंड येथील ब. प. विद्यालय आणि भाई मयेकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्यर्थ्यांसाठी ५० सायकल घेतल्या.
विद्यार्थ्यांना दुरुस्त केलेली सायकल जूनमध्ये दिली जाते व वार्षिक परीक्षेनंतर ही सायकल विद्यार्थी शाळेत परत देतात. मे महिन्यात संस्था स्वखचनि सायकलची दुरुस्ती करते. कोल्हापूर येथील देणगीदाराने चांगल्या सायकल्स कमी किमतीत दिल्या. दुसऱ्या वर्षी आणखी ५० सायकल्स घेतल्या. लावगण डॉकयार्डन ५० सायकली दिल्या. सध्या संस्थेकडे १७५ सायकल आहेत. काही देणगीदार एक-दोन सायकलचे पैसेही देतात. दोन शाळांतील उपक्रमानंतर काजुलींमध्ये नव्याने सुरू झालेल्या नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयात १५ सायकल मुलांना दिल्या आहेत. शाळेच्या दहा किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी शाळेत येतात.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संस्थेचा सायकल बँक हा स्तुत्य उपक्रम आदर्शवत आहे. मागील ८० वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने यशाची परंपरा राखत शाळेत नावीन्यता आणणे हे अतिशय खडतर कार्य संस्थेने अखंडित सुरू ठेवणे समाजाच्या विकसनासाठी गरजेचे आहे- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी
मी ब. प. विद्यालयात सातवीत शिकतो आहे. मी दररोज वरवडे खारवीवाडा येथून शाळेत येतो. संस्थेने राबवलेला सायकल बँक उपक्रम अतिशय उपयुक्त आहे- आदर्श हेदवकर, विद्यार्थी
मी दररोज साडेतीन किलोमीटवरून भगवतीनगर-शितपवाडी येथून ब. प. विद्यालयात येते. मी नवीत शिकत असून संस्थेची खूप खूप आभारी आहे. या उपक्रमामुळे शाळेत येणे सुकर झाले आहे- हर्षाली नवेले, विद्यार्थिनी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 01/Jan/2025














