चिपळूण : शहरातील उपनगर काविळतळी परिसरात नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी दाबाने अवेळी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी खासगी पाणी विक्रेत्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागप्रमुखांची बदली झाल्यानंतर या पदावर जबाबदार व्यक्ती नसल्याने सध्या या विभागात ठेकेदारामार्फत नेमलेले कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.
नगर परिषदेतील प्रशासकीय विभागातील महत्त्वाच्या चार खात्यांमधील प्रमुखांची नुकतीच बदली झाली. परिणामी, नागरी सेवासुविधांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने शहरातील पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख पेठे यांची बदली झाल्याने ते कार्यमुक्त झाले आहेत. शहरात गेल्या सहा महिन्यात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागल्याचे प्रकार घडले. त्यातच आता शासनाच्या सहकायनि १६५ कोटी रुपयांची नवी नळपाणी योजना होत आहे. कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी शहरात आणण्याच्या योजनेला निधीसह सर्व तांत्रिक प्रक्रिया मंजूर होऊन निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात असलेल्या योजना कामाच्या ऐनवेळी पाणीपुरवठा विभागप्रमुखांची बदलीमुळे कार्यमुक्त झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर ही योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आता पाणीपुरवठा विभाग विनाअधिकाऱ्यांमुळे कमकुवत झाला आहे. शहरातील काही भागात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडत आहे. त्याचा फटका काविळतळी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. अवेळी आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांना सध्या विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्याने काही खासगी पाणी टँकर धारकांकडून पाण्याचा दर वाढवण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 30/Sep/2024