पेपर फुटला तर प्रत्येक विद्यार्थ्याला 10 हजारांची भरपाई द्या : अभिजित दीपके

पुणे : नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला विद्यार्थी, पालक तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत आपली मते मांडली. यावेळी आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ठोस मागण्या मांडल्या.

अभिजीत दिपके म्हणाले की, संविधान हातात घेणे किंवा ‘जय भीम’च्या घोषणा देणे अराजकतेचे लक्षण कसे ठरू शकते? संविधानात बहुमत नसताना शपथ घेण्याची तरतूद कुठे आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. पेपरफुटी झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना किमान 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, परीक्षा पुढे ढकलल्यास किंवा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचा झालेला खर्च सरकारने भरून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, पुढील परीक्षेची तारीख जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही त्यांनी केली. निवडणुकांचे निकाल एका महिन्यात लागू शकतात, मग विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेसाठी तत्पर नियम का नसावेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

परीक्षेचे उत्तरपत्रिका मूल्यांकन ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष पद्धतीने व्हावे, तसेच परीक्षा उशिरा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा किंवा प्रयत्नांच्या (Attempts) संख्येवर परिणाम होऊ नये, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारच्या व्यवस्थापकीय अपयशाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सरकारची भूमिका काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.