नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार बंडखोर झाले आहेत. या आमदार-खासदारांनी स्वतंत्र गट बनवला आहे. त्यात काँग्रेसनेममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला पक्षात विलीनीकरणाची ऑफर दिल्याची चर्चा होती.
मात्र या चर्चा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आल्या. परंतु आता काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाची ऑफर दिल्याचं समोर आले आहे.
देशाच्या राजकारणात विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीत काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे असं सूत्रांच्या हवाल्याने सीएनएन वृत्तवाहिनीने बातमी दिली. अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या प्रस्तावावर भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. परंतु येणाऱ्या काळात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये झाले तर लोकसभेत काँग्रेस खासदारांची संख्या ८ ने वाढेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला होता. इंडिया आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली होती. या पक्षाचे प्रमुख शरद पवार सध्या राज्यसभेत खासदार आहेत. सुप्रिया सुळे, निलेश लंके, अमोल कोल्हे, अमर काळे यांच्यासह ८ लोकसभेचे खासदार आहेत.
संजय राऊतांनीही मांडले होते मत
राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस विचारधारेच्या पक्षांनी विलीनीकरणाचा विचार केला पाहिजे असं मत खासदार संजय राऊत यांनी मांडले होते. काँग्रेसपासून वेगळे होऊन ज्या लोकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता त्यांनी पुन्हा एकत्र यायला हवे. अनेक असे नेते आहेत जे काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वातील सरकारचा भाग राहिलेले आहे. ते त्याच विचारधारेचे आहेत. जर काँग्रेस विचारधारेचे लोक एकवटले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मोठं आव्हान उभे करता येऊ शकते. शरद पवारांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी ज्यांच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पक्ष बनवला होता. त्यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले. संजय राऊत नेहमी देशहिताच्या दृष्टीने त्यांचे मत मांडत असतात. प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या सल्ल्याची निश्चित नोंद घेऊ असं सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का हे पाहणे गरजेचे आहे.














