राजापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्ह्यात राजकीय वातावरणनिर्मितीला मात्र सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार हवा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत असताना आता तर राजापुरात यावरून बॅनरबाजीदेखील सुरू झाली आहे. या अनुषंगाने सध्या शहरातील जवाहर चौकात लागलेला ‘राजापूर नपुंसक नाही उमेदवार देण्यासाठी’ अशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विधानसभा निवडणुका आता केव्हाही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. ठाकरे सेना, काँग्रेस, शिंदे सेना, भाजपा या अशा सर्वच पक्षांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावेदारी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यातच राजापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी स्थानिक उमेदवाराला प्राधान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हाच धागा पकडत राजापूर शहरातील जवाहर चौक येथे मी राजापूरकर या नावाने ‘उमेदवार देण्यासाठी राजापूर नपुंसक नाही’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या राजापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. हा बॅनर कोणी लावला त्याचे नाव समजू शकले नसले तरी राजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक उमेदवाराच्या नावाचा विचार करायला लावण्यासाठी हा बॅनर दुवा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/Sep/2024