चिपळूण : तालुक्यातील गुहागर-विजापूर महामार्गावरील मिरजोळी साखरवाडी या रस्त्याची दुर्दशा झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. सातत्याने तोंडी व लेखी तक्रार करून देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाविरुद्ध ‘या प्रशासनाचं करायचं काय’ अशी घोषणा देत खड्यात वृक्षरोपण करत निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी मिरजोळी सरपंच कासम दलवाई, उपसरपंच विनोद पवार, सदस्य गणेश निवाते, संदीप जाधव, मुमताज दलवाई, ग्रामस्थ सुधीर हारे, नाथा पेडणेकर, शिरळ सरपंच राऊत, सदस्य गुलजार कुरवले, कबीर दलवाई, समद दलवाई, दीपक महाडिक, मिलिंद सकपाळ आदी हजर होते.
चिपळूण ते गुहागर या महामार्गावरून अनेक गावे जोडली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. साखरवाडी मिरजोळी याच रस्त्यावरून वाहनांना व प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबतची तक्रार केली असता पावसाळ्यानंतर काम सुरू करण्यात येईल, निधी मंजूर झालाय, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे; मात्र, आता होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न सरपंच कासम दलवाई व ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 30/Sep/2024