रत्नागिरी : जिल्हयात सावकारी धंदा पुन्हा फोफावतोय ?

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्हयात अनेक भागात सावकारी धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला असून, शासकीय यंत्रणेकडून ‘तेवढ्या ‘पुरतीच दखल घेतली जात असल्याने कर्जदाराला मारहाणीचे प्रकार घडत आहेत. राजकीय वरदहस्तामुळे सावकारांवर अंकुश लावायचा कुणी, हा प्रश्न असून, खासगी सावकाराकडून कर्ज घेणारे हतबल होत असून, व्याजावर व्याज चढत असल्याने कर्ज घेणारे मेटाकुटीला आले आहेत.

मागील काही वर्षांपर्यंत जिल्ह्यात ठरावीकच नोंदणीकृत सावकार होते. मात्र, तीन-चार वर्षात सावकारांची संख्या वाढली आहे. अधिकृत सावकारांबरोबरच अनधिकृत सावकारी करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. काही महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत एका सावकाराविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी सावकारी धंद्याविरोधात फास आवळला जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती; परंतु या सावकारांवर राजकीय वरदहस्त असल्याने, पोलीस यंत्रणा व सहकार विभागाकडूनही जेवढ्यास तेवढी कारवाई करीत, कागदपत्रांचे घोडे नाचवले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा सावकारी पैसे देणाऱ्यांकडून हप्ते चुकवणाऱ्या एका कर्जदाराला बोलावून मारहाण करण्यात आल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यातून काहींना अटकही झाली. मात्र आता याबाबत अनेक चर्चा पुढे येत आहेत.

सावकारी व्यवसाय करणारे फायनान्सच्या नावाखाली लुबाडणूक करीत असल्याचे कर्ज घेणाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकजण बॉण्डवर सह्या घेताना ते कोऱ्या कागदावर घेतात, पैशाची आवश्यकता असल्याने सह्या कराव्या लागतात, असेही काही कर्जदारांनी सांगितले. मात्र नंतर त्रास दिला जातो. व्याजाचे पैसे देताना तारखेच्या तारखेला दिले तरी अनेकद त्याची पावती दिली जात नाही धनादेशाने रक्कम हे सावकार व त्यांचे वसुली क्लार्क स्वीकारत नाहीत.

कर्जाचा हप्ता चुकल्यास अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत धमकावले जाते. त्यामुळे अनेक जण् तक्रारीही करण्याचे टाळतात. अनेकद घरे, जमीन लाटण्याचेही किस्से कर्जदारांकडून सांगितले जात आहेत.

Physciobot

एखादा कर्जदार नियमित तारखेला पैसे परत करत असेल तर पाच ते सहा महिन्यांनी त्याला एखाद्या रकमेचा धनादेश देऊन तो वटवण्यास सांगून, सावकार त्याच्याकडून पैसे घेतात आणि दोन-तीन वर्षानी पैसे फेडले नाहीत म्हणून कर्जदाराविरोधात पुन्हा तक्रारी करण्यास मोकळे होत असल्याचेही काही कर्जदारांनी नाव घेण्याच्या अटीवर सांगितले. चार दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरात घडलेल्य या प्रकारामुळे पुन्हा एकदा सावकारी धंद्याविरोधात पोलीस कारवाईच बडगा उचलणार का, असा प्रश्नह आता उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 06/Jan/2025