Finolex Academy Ratnagiri Ranking: ‘द वीक-हंसा रिसर्च’ सर्व्हेमध्ये फिनोलेक्स अकॅडमीची गगनभरारी; विविध श्रेणींमध्ये मिळवले पटकावले मानांकन

मुंबई विद्यापीठात ५ वे, तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २० वे स्थान; कोकणातील एकमेव संस्था

रत्नागिरीतील ‘फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी’ने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या यशाचा ध्वज फडकावला आहे. प्रसिद्ध ‘द वीक-हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्व्हे २०२६’ मध्ये फिनोलेक्स अकॅडमीने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय मानांकन पटकावले आहे.

‘द वीक-हंसा रिसर्च सर्व्हे २०२६’ मधील फिनोलेक्सचे स्थान

‘द वीक’ मासिकाच्या वार्षिक सर्वेक्षणात पायाभूत सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योगांशी असलेले संबंध, रोजगाराच्या संधी आणि प्रशासन अशा विविध कडक निकषांवर देशभरातील महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये फिनोलेक्स अकॅडमीने मिळवलेली मानांकने खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई विद्यापीठ: ५ वे स्थान
  • महाराष्ट्रातील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये: २० वे स्थान
  • भारताचा पश्चिम विभाग: २६ वे स्थान
  • राष्ट्रीय स्तरावरील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये: १७७ वे स्थान
  • सरकारी-खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संयुक्त क्रमवारी: २०६ वे स्थान

विशेष बाब: सरकारी-खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या या संयुक्त क्रमवारीत २०६ वे स्थान मिळवणारे फिनोलेक्स हे संपूर्ण कोकण विभागातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

गेल्या तीन दशकांपासून गुणवत्तेचा ध्यास

१९९६ मध्ये फिनोलेक्स समूहाचे संस्थापक अध्यक्ष कै. पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या तीन दशकांत या संस्थेने केवळ अभियांत्रिकी शिक्षणावरच भर दिला नाही, तर व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देऊन हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे.

यापूर्वीही ‘इंडिया टुडे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय २०२६’ च्या सर्वेक्षणात फिनोलेक्सने राष्ट्रीय स्तरावर १८८ वे, सरकारी-खासगी संयुक्त क्रमवारीत २२१ वे, महाराष्ट्रात २१ वे आणि मुंबई विद्यापीठात ६ वे स्थान मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 21-07-2026