Pawas Krushi Vibhag Quarters: पावस कृषी विभागाचे निवासस्थान मोजतेय अखेरची घटका: १५ वर्षांपासून ओस; दुरुस्तीची मागणी

निवासाअभावी आणि रिक्त पदांमुळे कृषी सेवा प्रभावित; सरकारी मालमत्तेची मोठी नासाडी

रत्नागिरी तालुक्यातील पावस बाजारपेठ मार्गावरील कृषी विभागाचे कृषी सहायकांसाठी बांधलेले शासकीय निवासस्थान गेल्या तब्बल १५ वर्षांपासून वापराविना ओस पडले आहे. योग्य देखभालीअभावी इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून परिसरात रानटी गवत आणि झाडी वाढल्याने ही इमारत आता ढासळण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे लाखो रुपयांच्या सरकारी मालमत्तेची धूळधाण होत असल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.

१५ वर्षांपासून दुर्लक्ष; इमारतीची अत्यंत जीर्णावस्था

पावस मंडळ कार्यालयाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कृषी सहायकांच्या निवासासाठी ही इमारत उभारण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात येथे कृषी सहायक वास्तव्यास होते, परंतु गेल्या १५ वर्षांपासून येथे कोणीही राहत नसल्याने इमारतीची बिकट अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात पूर्णगड सागरी पोलीस ठाणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिक व सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या आहेत, मात्र कृषी विभागाचे हे निवासस्थान संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत आहे.

रिक्त पदे आणि अतिरिक्त कार्यभारामुळे शेतकरी हैराण

सध्या मंडळ कार्यालयातील अनेक कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत. कार्यरत् कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त गावांचा कार्यभार असल्याने त्यांना प्रत्येक गावात नियमितपणे पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक कृषी सहायक खाजगी ठिकाणी राहून कामकाज सांभाळत आहेत. पूर्वी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र कृषी सहायक असायचा, मात्र बदल्या आणि परजिल्ह्यात होणाऱ्या नियुक्त्यांमुळे गेल्या दशकात कर्मचाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे.

स्थानिक शेतकरी उदय पावसकर यांची प्रतिक्रिया:

“कृषी सहायकांकडे अतिरिक्त काम असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही, अनेकदा त्यांचा शोध घ्यावा लागतो. रिक्त पदे तातडीने भरून शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती करून ते पुन्हा वापरात आणावे.”

इमारतीची दुरुस्ती करून पुनर्वापराची मागणी

सरकारी मालमत्ता वाचवण्यासाठी कृषी विभागाने तातडीने या इमारतीची दुरुस्ती करून निवासस्थान पुन्हा वापरात आणावे किंवा नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्याचा उपयोग करावा, अशी आक्रमक मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 21-07-2026