खेडमध्ये टंचाई आराखडा बैठकीबाबत अद्याप नियोजन नाही

खेड : जानेवारी महिना उजाडूनही येथील पंचायत समितीने टंचाई आराखडा बैठकीबाबत अद्याप नियोजनच केले नसल्याचे समोर आले आहे. यामागचे नेमके कारण गुलदस्त्यातच असून आराखडा बैठक घेणार कधी अन् नियोजन करणार कधी, असा उपहासात्मक सवाल उपस्थित केला जात आहे.

टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा पातळीवरही पाठवला जातो. मात्र, जानेवारी महिना उजाडूनही अद्याप टंचाई आराखडा बैठकच झालेली नाही.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आमदारांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा बैठक घेवून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. याच बैठकीत संभाव्य पाणीटंचाईबाबत चर्चा करून पाण्याची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने राबवायच्या उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेतले जातात. मात्र बैठकच झाली नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील पंचायत समितीने टंचाई आराखडा बैठक घेण्याबाबत अद्याप ‘इंटेस’ दाखवलेला नाही. यामागचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. पाणीटंचाई आराखडा बैठकीचे पुरते तीनतेराच वाजल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 09/Jan/2025