चक्राकार वाऱ्यांचा परिणाम; राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. सोमवारी (दि.१३) राज्यात मालेगावात सर्वांत कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

पुण्यात १७.१ अंशांवर तापमान होते, तरी पुणेकरांना बोचरी थंडी जाणवत होती.

येत्या दोन दिवसांमध्ये चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.

सध्या राज्यातील तापमानाचा पारा १० अंशांच्याही पुढे गेला आहे. दोन- तीन दिवसांमध्ये राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तापमानात पुढील काही दिवस चढ-उतारही राहणार असल्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतातही थंडी कमी-जास्त होत असून, अनेक भागांत सकाळी दाट धुके जाणवत आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर भारतात पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वेगाने येत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, जमिनीलगत दाट धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे राज्यातील किमान तापमान १० अंशांच्या पुढे सरकले आहे. राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

किमान तापमान स्थिती (अंश.से)
पुणे : १७.१
नगर : १६.७
महाबळेश्वर : १४.४
मालेगाव : १३.०
सोलापूर : १८.३
मुंबई : २१.४
बीड : १५.०
नागपूर : १६.६

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 14-01-2025