दापोलीत बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित नसल्याचा गैरफायदा

दापोली : कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत प्रामाणिक काम करावे आणि शासकीय कामकाजात दिरंगाई होऊ नये या उद्देशाने शासनाने बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली. मात्र अनेक शासकीय विभागात ही प्रणाली कार्यान्वित नसल्याने कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र सध्या दापोली तालुक्यात शासनाच्या सर्वच विभागात पहावयास मिळत आहे.

शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा येत असल्याचे दिसून येत आहे. हजेरी नोंदवहीवर सही करून कर्मचारी निघून जाऊ नये, यासाठी शासनाने कार्यालयात सकाळी येतेवेळी व सायंकाळी जातेवेळी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, दापोली तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावत आहे.

दापोली तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयात, शासकीय विभागात लावण्यात आलेले बॉयोमेट्रिक यंत्र नादुरुस्त पडून आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनियमितेमुळे शासकीय कार्यालयांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा प्रत्यय अनेकदा नागरिकांना येतो. शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात दिसत नाहीत. अनेक कर्मचारी अन्य तालुक्यातून ये-जा करतात दुपारी १२ पर्यंत कार्यालयात पोहोचणे आणि दुपारी ३ वाजता निघून जाणे असे प्रकार अनेक कर्मचाऱ्यांचे नित्याचेच झाले आहेत. याकडे गांभियनि लक्ष देऊन बायोमेट्रिक प्रणाली सर्वच शासकीय कार्यालयात कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 15/Jan/2025