रत्नागिरी : जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून 25 बंधार्यांची कामे मंजूर आहेत. सुमारे पावणे दोनशे कोटीची ही कामे आहेत. या कामांना देखील सीआरझेडच्या परवानगी आवश्यकता असून चेन्नई येथील आयआरएस संस्थेकडून अधिकृत नकाशे मिळाल्यानंतरच सीआरझेडची मंजूरी मिळणार आहे. त्यामुळे बंधार्यांची ही सर्व कामे सीआरझेडच्या मंजुरीमुळे लांबणार असल्याचे चित्र आहे. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील ही सर्व कामे हैद्राबादच्या कंपनीला देण्यात आली आहेत.
चेन्नई येथील आयआरएस विभागाच्या परवानग्यांमुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामांमध्ये खोडा निर्माण झाला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेल्या भगवती बंदीर येथील क्रूझ टर्मिनल देखील याच परवानगीमुळे रखडले आहे. सुमारे 302 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर आहेत. परंतु सीआरझेडच्या या परवानगीमुळे हे काम रखडले आहे. त्यात भर म्हणजे आता जिल्ह्यातील महत्त्वाचे 25 बंधारे देखील याच परवानगीसाठी रखडण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण योजनेतून हे बंधारे मंजूर आहेत. यामध्ये आडे, कर्दै येथे 2, कोळथे, लाडघर, मुरूड येथे 2, हर्णै येथे 2, पाजपंढरी, बुरोंडी,पाडले, सालदुरे, करजगाव हे सर्व दापोली तालुक्यातील तर भाटे, गावखडी, वायंगणी, घेरापुर्णगड, नेरूळ, गणेशगुळे, आरे, भंडारपुळे, गणपतीपुळे, नेवरे, वारे, ही रत्नागिरी तालुक्यातील या धुपप्रतिबंधक बंधार्यांचा या कामांमध्ये समावेश आहे.
सर्व कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. परंतु चेन्नई येथील आयआरएस संस्थेकडुन या कामांचे अधिकृत नकाशे मिळणे आवश्यक आहे, त्यानंतरच परवानगी मिळणार आहे. देशाच्या पातळीवरची ती एकमेव संस्था असल्यामुळे तिथून नकाशे मिळण्यास विलंब होणार आहे. पैसे भरून त्यासाठीचे प्रस्ताव गेले आहे. आयआरएस विभागाचे अधिकारी येऊन या जागांचे मॅपिंग करणार त्यानंतर नकाशांना मंजूरी मिळणार आहे. नकाशे दिल्यानंतर बैठक होऊन कांदळवन संरक्षणासह अन्य बाबींचा विचार करून नंतर कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे ही कामे रखडण्याची शक्यता आहे. पावणे दोनशे कोटीची ही कामं स्थानिक ठेकेदरांना न मिळता हैद्राबाद येथील कंपनीला देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 15-01-2025
