रत्नागिरी : रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या इतिहासाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण पुस्तकात खोटी माहिती दिली गेल्याचे समोर आले आहे. या मंदिराचे श्रेय वि. दा. सावरकर यांना दिले गेले आहे, परंतु वास्तविक हे मंदिर दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी बांधले होते.
महाराष्ट्र शासनाने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या इयत्ता ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. २४ वर पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा खोटा इतिहास समाविष्ट केला आहे. या मंदिराची स्थापना १९३१ मध्ये भागोजी शेठ कीर यांनी स्वखर्चाने केली होती. त्यांनी स्वतः जागा खरेदी करून मंदिर बांधले व स्पृश्य-अस्पृश्यांना एकत्र आणून सहभोजन घडविले, जे त्या काळात एक अनोखे पाऊल होते.
भागोजी शेठ कीर यांनी मंदिर व त्या शेजारील चाळ बांधण्यासाठी खाजगीतून मोठा खर्च केला होता, जो १९३३ सालच्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद केलेला आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी दरवर्षी रुपये १५००/- देत असत.
या चुकीच्या इतिहासाबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व तत्कालीन शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांना ३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यामुळे रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांचे मार्फत लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कार्यवाहीचे लेखी आश्वासन मिळाल्यास उपोषण स्थगित करण्यात येईल, असे भंडारी समाजाकडून कळविण्यात आले आहे.