राजापूर : तालुक्यातील अणसुरे खाडीतून दरदिवशी शेकडो टन कच काढण्यात येते. त्यामुळे या परिसरातील जलजीवन धोक्यात आले आहे. खाडीतून विनापरवाना कच काढणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपटीवरील अणसुरे खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून शिंपल्यांची कच काढून ती केरळ, कर्नाटक, आदी राज्यांमध्ये पाठवली जाते. सुरुवातीला एक परप्रांतीय व्यावसायिक शासनाकडून नाममात्र ब्रासच्या परवानग्या घेऊन कच उत्खनन करत होता, मात्र या उत्खननाला काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर काही पुढाऱ्यांना हाताशी धरून या व्यावसायिकाने हे कच उत्खनन सुरू ठेवले आहे. उत्खनन केलेली कच नेणाऱ्या डंपरच्या वाहतुकीमुळे या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचवेळी शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे.
याकडे संबंधितांकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरमान्य अणसुरे खाडीमध्ये सुरू असलेल्या उत्खननाबाबत तालुकाप्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठल्याही उत्खननाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातून ही परवानगी घेतली जात असल्याचे पुढे आले आहे. खाडीतील उत्खननाच्या परवानगी बाबत साशंकता व्यक्त करताना या उत्खननाला नेमका आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रांतांकडून चौकाशीचे आदेश
तालुक्यातील अणसुरे खाडीतील कच उत्खननाची तत्काळ चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करा, अशा सूचना राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी येथील तहसीलदार विकास गंबरे यांना दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जाणाऱ्या अहवालातून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोंबड्यांच्या खाद्यात उपयोग
अणसुरे खाडीत काढण्यात येणाऱ्या कचचा नेमका वापर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही. मात्र, कोंबड्यांच्या खाद्यामध्ये कच्ची बारीक पावडर करून वापरली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कचला मोठ्याप्रमाणात मागणी असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 15/Jan/2025