राजापूर : सत्यनारायण देसाईंनी तयार केली स्वअध्ययनासाठी ‘आनंददायी आवर्तसारणी’

राजापूर : विज्ञानातील रसायनशास्त्राचा पाया असलेल्या आवर्तसारणीचे आकलन व अध्ययन उत्तमरीतीने होणे गरजेचे आहे. मात्र, आवर्तसारणी हा विषय वर्गामध्ये शिकवताना वेळेची मर्यादा येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वअध्ययन केले पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन आवर्तसारणीच्या स्वअध्यनासाठीची सुलभ पद्धत शिक्षक सत्यनारायण देसाई यांनी तयार केली आहे. त्याला ‘आनंददायी आवर्तसारणी’ असे नाव दिले आहे. ही प्रतिकृती राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडली गेली आहे.

सत्यनारायण देसाई हे तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देसाई यांची ‘आनंददायी आवर्तसारणी’ पध्दत मांडली होती. या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या प्रतिकृतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक गटातून युवराज साळवी आणि अनस पाटणकर या दोन विद्यार्थ्यांनी ‘श्रमिक ऊर्जा वाचवणारी साधने’ ही प्रतिकृती तयार केली होती. या प्रतिकृतीने शाळेसह तालुक्याच्यावतीने जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व केले होते.

अशी आहे आवर्तसारणी शैक्षणिक साधन वर्गात, व्हरांड्यात किंवा प्रयोगशाळेमध्ये लावता येईल, जेणेकरून मुलांना स्वतःच्या कुवतीनुसार आवर्तसारणीचे अध्ययन करणे सुलभ होणार आहे. निसर्गात स्थिर अवस्थेतील मूलद्रव्ये या शैक्षणिक साधनांमध्ये ठेवलेली असल्यामुळे मुले ती सहजरित्या पाहू शकतात अन् ओळखूही शकतील, मुलद्रव्यांची नावे क्रमाने पाठ करण्यासाठी काव्यात्मक व सोपी वाक्ये दिलेली असल्याने ती सहज लक्षात राहतात.

विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने आवर्तसारणीचे स्वअध्यन करता येईल, अशी ‘आनंददायी आवर्तसारणी’ तयार केली आहे. एमपीएससी वा युपीएससी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये सह‌भागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या आवर्तसारणीचा वापर करून नाव, अनुक्रमांक आणि संज्ञा लक्षात ठेवण्यासाठीही ही आवर्तसारणी उपयुक्त ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 15/Jan/2025